बुलडाणा - शहरातील ड्रीम व्हॅली मल्टीसर्व्हिसेस या अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर शनिवारी (ता.२६) दुपारी भुसावळ, मलकापूर रेल्वे सुरक्षा (आरपीएफ) दलाने बुलडाणा शहर पोलिसांच्या मदतीने छापा मारला आहे. यावेळी शेकडो बुकिंग असलेल्या रेल्वे तिकीटांसह आरोपीला ताब्यात घेतले असून कॉम्पुटर, प्रिंटर, 2 मोबाईलही जप्त केले आहेत. सुनील गुलाबराव वाघ असे आरोपीचे नाव असून तो एकता नगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाची आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवरून आरोपी सुनील वाघ साईटला हॅक करून कितीही आणि कोणतेही निश्चित (कंन्फर्म) तिकीट काढत होता. ही बाब रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकशीत समोर आली आहे. मात्र, या संदर्भात रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
बुलडाण्यात अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर आरपीएफ दलाचा छापा हेही वाचा - नांदेड : 'त्या' सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून?...
ऐन दिवाळीत तिकिट फुल्ल असल्याचे भासवून निश्चित (कंन्फर्म) तिकीटांची जास्त दराने विक्री करून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेल्या ड्रीमव्हॅली मल्टीसर्व्हिसेस मध्ये अवैध स्वरूपात तिकिटांची बुकिंग करून ग्राहकांची लूट होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ आणि मलकापूर रेल्वे सुरक्षा (आरपीएफ) दलाला मिळाली होती. या माहितीवरून छापा मारला असता ड्रीमव्हॅली मल्टीसर्व्हिसेसचा मालक सुनील गुलाबराव वाघ याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याच्याकडून पुढील दिवसांची शेकडो निश्चित (कंन्फर्म) तिकीटे आढळून आली.
हेही वाचा - तलवारीच्या धाकेवर आईस्क्रीम विक्रेत्याला लुटणाऱ्या निग्रो नागरिकाला अटक
विशेष म्हणजे आय. आर. सी. टी. सीच्या वेबसाईटवरून एका वेळी 4 ते 5 तिकीट बुक करण्याची सुविधा असतानाही सुनील साईटला हॅक करून कतीही आणि कोणतेही तिकीट कंन्फर्म काढत होता. आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेवून तिकीट सेंटरवरून कॉम्पुटर, प्रिंटर, 2 मोबाईल जप्त केले आहे. प्रकरणी आरपीएफ पथकाने आरोपी विरोधात 1989 रेल्वे अधिनियमच्या कलम 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात रेल्वे बुकिंग विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा संबंध आहे का? यासंदर्भात चौकशी सुरू आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित याच्या पथकातील निरीक्षक राजेश बनकर, उपनिरीक्षक आर के सिंग, सी एस सातपुते, प्रधान आरक्षक नितीन लोखंडे, आरक्षक शेख नावेद, प्रमोद ढोले, सुजित यादव, संतोष यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोबतच बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबडे यांच्या आदेशाने पोलीस शिपाई दत्ता नागरे, संदीप कायंदे हे ही या कारवाईत सहभागी होते.