महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाने माणुसकी हरवली; अंत्यविधीसाठी नातेवाईकांसह गावकऱ्यांचाही नकार - कोरोनाची भीती अंत्यसंस्कारास नकार

एका आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकर्‍यांनी कोरोना आजाराच्या भीतीने अंत्यविधीसाठी नकार दिला. मात्र, तब्बल चार तासानंतर प्रशासनाने दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडला.

बुलडाणा
बुलडाणा

By

Published : Apr 25, 2020, 8:38 AM IST

बुलडाणा - कोरोनाच्या संकटात माणसातली माणुसकी हरविल्याची मन सुन्न करणारी घटना गुरुवारी (23 एप्रिल) बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली. एका आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकर्‍यांनी कोरोना आजाराच्या भीतीने अंत्यविधीसाठी नकार दिला. मात्र, तब्बल चार तासानंतर प्रशासनाने दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडला. विशेष म्हणजे मृतदेह स्मशान भूमीमध्ये उतरविण्यासाठीसुद्धा कोणीही न आल्याने एका मुस्लीम वृद्ध व्यक्तीने समोर येवून रुग्णवाहिका चालक आणि त्याने मृतदेह स्मशान भूमीत टेकवला.

खामगाव तालुक्यातील रोहन येथील एक जण आजारी असल्याने त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह मंगेश दैवत यांनी मोफत आपल्या रुग्णवाहिकेतून त्यांच्या रोहना या गावात गुरुवारी आणला. मात्र, कोरोना आजाराच्या भीतीपोटी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह गावकर्‍यांनी देखील त्यांच्यावर अंत्यविधी करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर रुग्णवाहिकेमधून मृतदेह खाली उतरविण्यासाठी सुद्धा कोणीही समोर आले नाही. रुग्णवाहिकेचा चालक आणि एका मुस्लीम वृद्धाने मृतदेह खाली घेतला. यावेळी स्मशानभूमीत मृताची आई, पत्नी आणि दोन चिमुकली मुले तब्बल चार तास टाहो फोडत होते. मंगेश दैवत यांनी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांना माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदारांनी कर्मचारी पाठवून मृतदेहावर चार तासानंतर अत्यंविधी करण्यात आला. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मात्र माणुसकी हरवली असल्याचे चित्र बुलडाण्यातील मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details