बुलडाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर हे आक्रमकतेसाठी परिचित आहे. शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी अनेक आंदोलने त्यांनी केली. रविकांत तुपकर यांचा एक अशाचप्रकारचा व्हिडीओ समोर आलेला आहे. आपल्या घरासमोरील पाईपलाईन लिकेजचे काम जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंत्याकडून करवून घेतल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे. हा व्हिडीओ 10 मे रोजीचा असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये पोलीस कर्मचारीही दिसत आहेत.
रविकांत तूपकरांनी करवून घेतले काम असा होता प्रकार -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे बुलडाण्यातील चिखली रोडवरील विद्युत महावितरण कार्यालयाच्या बाजूला घर आहे. त्यांचा घरासमोरील पाईप लाईन लिकेज असल्यामुळे कंत्राटदाराने त्याठिकाणी खोदकाम करून ठेवले होते. त्यामुळे तुपकरांना त्यांच्या घरात ये-जा करण्यासाठी त्रास होत होता. शिवाय त्यांच्या घरातील नळाला गढूळ पाणी येत होते. याबाबतची तक्रार रविकांत तुपकर यांनी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील कंत्राटदार व जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आर.एन. भिलवडे यांना अनेकवेळा केली. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद आला नाही.
कार्यकारी अभियंत्याला आणले खड्ड्याजवळ -
रविकांत तुपकरांनी केलेल्या तक्रारीचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा राग अनावर झाला. 10 मे रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर.एन. भिलवडे यांना त्यांच्या कार्यालयातून वाहनामध्ये खोदलेल्या खड्ड्याजवळ आणले. आणि त्यांच्या उपस्थित काम करवून घेतले. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता भिलवडे यांनी, "हे प्रकरण त्याचदिवशी संपल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला".