बुलढाणा :मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कार्यकर्त्यांसोबत मोठी आंदोलने केली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमची कार्यकर्त्यांचीच आहे. वीस वर्षे आम्ही संघटनेत काम करत आहोत. त्यामुळे आता राज्याच्या पुन्हा एकदा संघटना फुटीचा प्रकार घडतो की काय? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. तुपकर हे राजू शेट्टींना बाजूला करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा सांगतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी संघटनेमध्ये बंड होणार का :राज्यात सध्या कोण कोणासोबत, कोण सत्तेत तर कोण विरोधक हे सांगणे कठीण झाले आहे. एकाच पक्षाचे आता दोन पक्ष आणि संघटना झाल्याचे समोर येत आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण बुधवारी झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांचा नावाचा उल्लेख टाळत बुलढाणा जिल्ह्याच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांकरता तयार राहण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त पाहणीच्या वेळेस देखील राजू शेट्टींसोबत रविकांत तुपकर उपस्थित नव्हते. यावर त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करत उपस्थित नसल्याचे सांगितले. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बंडाचे निशाण रविकांत तुपकर फडकवणार का, हे लवकरच कळेल. यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली रोखठोक आणि आक्रमक भूमिका मांडली.