बुलडाणा - मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील रत्नापुर गावाने आज मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील मतदान केंद्रावर एकही मतदार आज फिरकला नाही. विकास करा, त्याशिवाय मतदान करणारच नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे देशभरात लोकशाहीचा उत्सव म्हणून मतदान केले जात असताना, रत्नापुरात शून्य टक्के मतदान झाले आहे.
रत्नापुर गावाने मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार घातला आहे. तर ३५८ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावर स्मशानशांतता पसरली आहे.
विशेष म्हणजे मेहकर तालुक्यातील आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला अशी रत्नापूरची ओळख आहे. आदिवासी बहुल असलेल्या गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून मूलभूत सुविधादेखील मिळाल्या नाहीत. एक महिन्यापूर्वी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला होता. तरीही सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून प्रभावी पावले उचलण्यात आली नाहीत. जोपर्यंत गावाला सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.