बुलडाणा -जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत कार्यवाही होत नसेल तर अधिकाऱ्यांनी आपल्या बदल्या करुन घ्याव्यात, अशा शब्दांत शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली 'जिल्ह्यातील वरली-मटका, जुगार, दारू बंदी होत नसेल, तर तुम्ही काय करता? हे धंदे तिथे चालतात जा, माझ्याकडे हे चालणार नाही. दोन दिवसात अवैध धंदे बंद झाल्याचा रिपोर्ट मिळाला नाही, तर तुमचे बाडबिस्तार गुंडाळा, अशा शब्दात राज्याचे अन्न व औषध मंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
हेही वाचा -शरद पवारांचा नाशिक दौरा अचानक रद्द; महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने मुंबईला रवाना
काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान मेहकर येथील काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांनी मेहकरमध्ये सर्रास अवैध धंदे सुरू असल्याचे सांगितले होते. त्यावेळी डॉ. शिंगणे देखील उपस्थित होते. शनिवारी शिंगणे मेहकरवरुन सिंदखेडराजा येथे कार्यक्रमानिमित्त जात होते. त्यावेळी खळेगाव, महारचिकना मार्गावर महिला आणि मुलींनी परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती दिली. शिंगणे यांनी बिबी येथील ठाणेदार सचिन यादव यांना बोलवून, अवैध धंदे सुरू असल्याचे तुम्हाला कसे दिसत नाही, असा प्रश्न केला.
पालकमंत्र्यांनी स्वत: पोलिसाची खरडपट्टी काढण्यापेक्षा बुलडाण्याच्या पोलीस अधिक्षकांना सांगून कारवाई करता आली असती. मात्र, पोलिसांना तंबी देऊन काय साध्य झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मतदार संघातील धंदे बंद करणार मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे काय, असा प्रश्न नागरिक विचारच आहेत.