बुलडाणा -एटीएमकार्ड क्लोन (बनावट) करून चक्क पोलिसांच्याच बँक खात्यातून ८० हजार रुपये लंपास केल्याची घटना जिल्ह्यातील खामगाव शहरात उघडकीस आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन कराळे असे फसवणूक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करून बँक ग्राहकांना काही जण लुटत असल्याचे प्रकार सर्वत्र सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील खामगाव शहरात चक्क एका पोलिसाच्याच एटीएम कार्डचे क्लोन (बनावट कार्ड) करून भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातील दोन वेळा ४०-४० असे एकूण ८० हजार रुपये काढल्याची घटना घडली आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन कराळे यांचे भारतीय स्टेट बँकेच्या खामगाव शाखेत खाते असून मोहन कराळे यांनी ते कार्ड त्यांचा मुलगा राहुल कराळेकडे दिले होते. तो ७ फेब्रुवारीला पुण्याहुन खामगावकडे येत असताना औरंगाबाद ते जालना दरम्यान असलेल्या करमाळा या गावात १८० रुपये किंमतीचे हेडफोन विकत घेण्यासाठी एटीएम कार्ड वापरून दुकान मालकाला पैसे दिले. यांनतर मुलाने ते कार्ड वडिलांना परत केले. मात्र, १२ फेब्रुवारीला जेव्हा पोलीस हवालदार मोहन कराळे हे बुलढाणा येथे ट्रेनिंगला होते तेव्हा त्यांच्या खात्यातून २०-२० हजार असे एकूण ४० हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला. याबाबत दुसऱ्या दिवशी ते बँकेत विचारपूस करण्यासाठी जात असतांनाच वाटेत त्यांना आणखी ४० हजार खात्यातून काढल्याचा मेसेज आला.