बुलडाणा- लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील धान्याची वाहतूक करीत असल्याचे भासवून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अकोला रोड बायपास जवळील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी २० एप्रिलच्या पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी पकडले. वाहनातील लपवलेला 12 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना खांमगावातून समोर आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने की कारवाई करून वाहन चालक शे. आबीद शे. हसन, रा. चिखली याला ताब्यात घेवून चिखलीतील गुटखा माफिया निसार हाजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे अवैध गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हे वाहन अमरावतीहून चिखलीकडे जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
धान्याच्या वाहनातून गुटख्याची तस्करी; 12 लाखांचा गुटखा जप्त
पोलिसांनी कारवाई करत 12 लाख रुपयांचा गुटखा पकडल्याने गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी वाहनचालकसह चिखलीतील गुटखा माफियावर गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीहून धान्याची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पो या वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना विशेष खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या पथकाने सोमवारी खामगाव येथील अकोला रोड बायपास जवळील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ पहाटे ४.३० वाजता ४०७ टेम्पो पकडला. वाहनाची तपासणी केली असता यामध्ये काही धान्य व १२ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. वाहन चालक शे. आबीद शे. हसन, रा. चिखली यास अटक करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे. हा गुटखा चिखली याठिकाणी येत होता. चालकाच्या जबाबनुसार चिखलीतील गुटखा माफिया निसार हाजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन असतांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही वाहन असो त्याची तपासणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितित सदर वाहन हे विनातपासणी अमरावती येथून खामगाव पर्यंत कसे आले ? हा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे. ही कारवाई करताना पथकामध्ये सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदिप मोटे, रवींद्र कन्नर यांचा समावेश होता.