बुलडाणा -मोताळा तालुक्यातील दोन लाख 92 हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. ही कारवाई काल (सोमवारी) पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बनावट नोटासह दोन जणांना अटक हेही वाचा-मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी?
बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात पहाटे 2 वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजिक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या 146 बनावट नोटा (दर्शनी किंमत 2 लाख 92 हजार रुपये), पाचशे रुपयांच्या पाच नोटा (किंमत 2500 रुपये), दोन दुचाकी (किंमत 40 हजार रुपये), तीन मोबाईल (किंमत 7 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने आरोपींना 26 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुणावली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरिक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.