बुलडाणा - सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन देशी कट्टयांसह, शस्त्रे आणि नकली सोन्याची नाणी असे 31 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 25 आरोपींना अटक करण्यात आले आहे.
सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे येथील व्यापाऱ्याची फसवणूक करून केली होती मारहाण-
खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची बनावट नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. या टोळीने राज्यातील अनेका लोकांना गंडविले. कमी किंमतीत सोन्याची नाणी देण्याचा व्यवहार ठरवायचा आणि व्यवहार सौदा ठरल्यानंतर संबंधितांना बोलवून त्यांच्याकडील रक्कम आणि ऐवज लुटायचे. अशाच पद्धतीने या टोळीने गुरुवारी (दि. ५ मे) पुणे येथील एका व्यापाऱ्यांची फसवणूक करून मारहाण केली व 15 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.
कॅाबिंग ऑपरेशनद्वारे केला पर्दाफाश-
पुण्याच्या व्यापाऱ्याला फसवून मारहाण केल्याप्रकरणी माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी खामगाव उपविभागीय पोलिस अधिकार क्षेत्रातील पोलीस निरिक्षक, सहा. निरिक्षक, पोलीस नायक यांनी गुरूवारी पहाटे चिखली रोडवरील अंत्रज येथे कॅाबींग ऑपरेशन राबविले. यावेळी टोळीतील 25 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे, सोन्या चांदीचे दागिने बनवट सोन्याच्या गिन्या,रोख रक्कम 26 लाख रुपये, 26 मोबाईल, तलवारी, सुरे ,भाले, कुऱ्हाड असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केले असून एकूण 31 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अशा प्रकराच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.