बुलडाणा - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या बुलडाणा शहरातील 2 नामांकित हॉस्पिटलच्या 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी (7 मे) ही कारवाई केली. यात एका हॉस्पिटलचे 2 आणि दुसर्या हॉस्पिटलचा 1 कर्मचारी आहे. त्यांच्याकडून एकूण 16 इंजेक्शन, 7 हजार रुपये रोख, 3 मोबाइल आणि 2 दुचाकी असा एकूण 2 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव राम शंकर गडाख, लक्ष्मण विष्णू तरमळे आणि संजय सुखदेव इंगळे असे आहे.
खासगी डॉक्टरांच्यां संबंधाचा तपास सुरू
बुलडाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढत्या भावाने काळ्या बाजाराने विकले जात असल्याची गुप्त माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी राम शंकर गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण विष्णू तरमळे (रा. पिंपळगाव सराई) आणि संजय सुखदेव इंगळे (रा. हतेडी, ह. मु. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा) या तिघांना येळगाव फाटा व जांभरून रोड या दोन ठिकाणाहून ताब्यात घेतले. तिघेही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्यातील दोन्ही हॉस्पिटल जवळच्या मेडिकलला जोडून आहेत. याच मेडिकलमधून रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्याचा धंदा सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधीत हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -मुंबई विमानतळावर एनसीबीकडून 4 किलो हेरॉइन जप्त
हेही वाचा -'मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करावा'