बुलडाणा- कोरोना काळात नियमांची तंतोतंत अंमलबजावणी करून घेणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी जर नियमांना पायदळी तुडवत असतील, तर यांच्यापासून नागरिकांनी नेमका काय आदर्श घ्यावा,असा सवाल बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील मोहरमच्या कार्यक्रमाचा व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमूळे उपस्थित झाला आहे. साखरखेर्डा गावांमध्ये मोहरमच्या निमित्ताने कार्यक्रमावर बंदी असतानाही असंख्य नागरिक एकत्र येऊन विना मास्क गर्दी करताना व्हिडिओत दिसत आहे. कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन करत चक्क स्वतः ठाणेदार व गावचे सरपंचही इतर नागरिकांना प्रोत्साहन देताना दोघांनी चक्क पैशाची ओवाळणी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
संपूर्ण राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला तर बुलडाणा जिल्ह्यातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिल्ह्यात आतापर्यंत 87 हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 672 रुग्णांचा आतापर्यंत कोरोणाने मृत्यू झाला आहे. त्यामुळेच अजूनही शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. ही नियमावली सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. या नियमावलींचे साखरखेर्डा येथील ठाणेदार जितेंद्र आडोळ यांनी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची सभा घेत नियमावलीचे वाचनही केले होते. मोहरमचा कार्यक्रम घरीच साजरा करा, असे आवाहन केले होते. मात्र, दुसरीकडे सरपंच दाऊत कुरेशी यांच्या नेतृत्वात गर्दी करून मोहरमचा कार्यक्रम सुरू असताना खुद्द ठाणेदार जितेंद्र आडोळ आणि सरपंच दाऊत कुरेशी विनामास्क शेकडो नागरिकांच्या गर्दीत सहभागी होऊन कोविड नियमांचे उल्लंघन करताना व्हिडिओत दिसत आहे. यावेळी त्यांनी पैशाची ओवाळणीही केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.