बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा (महादेव) येथे नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेकदा त्यांनी मोठा पूल बांधून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र, अद्यापही त्यांना पूल मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
२५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार २५ वर्षांपासून आमदार चैनसुख संचेतींची सत्ता -
मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा (महादेव) हे तिर्थक्षेत्र आहे. बोदवड तालुक्यातून येणारी देव नदी आणि मोताळा तालुक्यातून येणाऱ्या व्याघ्रा नदीचा संगम पिंपळखुटा येथे झाला आहे. या संगमावर प्रभू श्री रामचंद्रांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. त्यामुळे या गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. याच नदीच्या तिरावर पिंपळखुटा (महादेव) गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १ हजाराच्या घरात आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पिंपळखुळा (महादेव) गाव येते. या मतदारसंघावर गेल्या २५ वर्षांपासून भाजप आमदार चैनसुख संचेती यांची सत्ता आहे. मात्र, आमदार चैनसुख यांनी पिंपळखुळा ग्रामस्थांना कधी विकासाचे सुख दिलेच नाही.
हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पावसाळ्यात नदीकाठावर अडकतात -
ग्रामस्थांना गावात कुठलीही सोय नसल्याने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सुद्धा मलकापूरला जावे लागते. त्यामध्ये नदीवर कमी उंचीचा पूल आहे. नदीवर संगम असल्यामुळे पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांना नदीच्या तिरावर तासनतास ताटकळत बसावे लागते. गावातून २५ मुली शिक्षणासाठी मलकापूर येथे जातात. मात्र, पावसामुळे त्या नदीकाठावर अडकून पडतात. शेवटी ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षेसाठी नदीच्या काठावर उभे राहत असतात. पूर ओसरल्यानंतर रात्री २ वाजता त्यांना घरी जाता येते. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
हे वाचलं का? - पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?
२० वर्षांपासून पुलाची मागणी प्रलंबित, आमदारांकडून फक्त आश्वासन -
गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपळखुळा गावातीलच शंकरसिंग रामसिंग मोरे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालत पुरातून मानवी साखळीच्या आधारे स्मशानभूमीत गेले होते. त्यानंतर देखील गावातीलच भगवानसिंग रामचंद्र मोरे यांचे निधन झाले. यावेळी ग्रामस्थांवर तीच परिस्थिती ओढवली. गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांनी आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे मोठा पूल बांधून देण्याची मागणी केली. मात्र, आमदार महोदयांनी प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.