बुलडाणा : अमरावती विभागामध्ये सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण आढावा घेऊन प्राधान्यक्रमाने हे प्रश्न सोडवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (सोमवार) बुलडाणा येथे केले. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलसंपदा विभागाची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जिल्हानिहाय बैठका घेऊन रखडलेल्या प्रकल्पावर उपाययोजना करणार..
बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प, म्हणजेच जिगाव प्रकल्पाला दरवर्षी विशेष निधी मिळावा यासाठी आपण स्वतः राज्यपालांकडे मागणी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील जलसिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात दूर होईल. तसेच, त्याचा लाभ इतर जिल्ह्यांनाही होणार आहे, असे ते म्हणाले.
अमरावती विभागातील रखडलेले सिंचन प्रकल्प त्वरेने पूर्ण करणार; जयंत पाटलांचे आश्वासन गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये अमरावती विभागांमध्ये सिंचनाची कामे पाहिजे त्या प्रमाणात झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अमरावती विभागातील रखडलेले प्रकल्प त्वरेने पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण जिल्हानिहाय बैठका घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.
हेही वाचा :नागपूर : भाजयुमोतर्फे अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न