बुलडाणा : 'सी 1' वाघोबाला मिळणार वाघीण - बुलडाणा ज्ञानगंगा अभयारण्य बातमी
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या सी 1 या वाघासाठी जोडीदार शोधण्याच्या हालाचनीना वेग आला असून येत्या सहा महिन्यातच सी 1 वाघोबाला सहचारिणी मिळणार आहे.
बुलडाणा- टिपेश्वर अभयारण्यातून सी 1 हा वाघ मागील डिसेंबर महिन्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करत बुलडाणा मधील ज्ञानगंगा अभयारण्यात आला आणि जवळपास नऊ महिन्यापासून याच अभयारण्यात स्थिरावला आहे. आता त्याच्या सोबतीला वाघीण आणण्याच्या हालचालींना वेग आला असून सहा महिन्यात सी 1 वाघोबाला आता सहचारिणी मिळणार आहे.
जवळपास अडीच हजार किलोमीटर चा प्रवास करत सी 1 वाघ हा ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. या वाघासाठी वाघीण जोडीदार आणण्याच्या अनुषंगाने व्याघ्र संवर्धन समिती मार्फत 27 जुलैला रोजी आढावा बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये अंबाबरवा, काटेपूर्णा, मुक्ताई भवानी या अभयारण्याचे संवर्धनात्मक कॉरिडॉर बळकट करणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, परिक्षेत्रात येणाऱ्या काही गावांचे पुनर्वसन करणे यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली. हे सर्व अडथळे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जात आहेत.
एका वाघाला राहण्यासाठी स्क्वेअर किलोमीटर जागा, अन्न साखळीतील प्राणी लागतात त्यानुसार ज्ञानगंगा अभयारण्यात याच पद्धतीने पोषक वातावरण असल्याने ही एक जमेची बाजू आहे. त्यामुळे या परिस्थिती नुसार याच अभयारण्यात 20 वाघ स्थिर होऊ शकतात, असा अंदाज वन्यजीव वन परिक्षेत्र अधिकारी एम.डी. सुरवसे यांच्यानी व्यक्त केला आहे. तर कोरोनाचा फटका हा वाघ-वाघीणच्या मिलनाला देखील बसला असून आता मात्र व्याघ्र संवर्धनाच्या पुर्ततेसाठी विभागामार्फत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या सहा ते आठ महिन्यांत सी 1 वाघाला सहचारिणी मिळणार आहे. सोबतच येत्या काळात याच अभयारण्यात वाघांचे वास्तव्य देखील मोठ्या प्रमाणात वाढण्यास नक्कीच मदत होईल.