बुलडाणा- घरकूल योजनेतील घरे पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती सभापतींनी आज जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. कल्याणी गजेंद्र शिंगणे असे त्या उपोषणकर्त्या सभापतीचे नाव असून त्या देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती आहेत.
घरकूल योजनेसाठी सभापती कल्याणी शिंगणेंचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण
घरकुलांच्या मागणीसाठी देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यामध्ये प्रपत्र 'ब'मधील 324 अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण झाली पाहिजे, रमाई घरकुलाचे 1356 घरकुले अपूर्ण असून त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, प्रपत्र 'ड' नुसार तालुक्यामध्ये 10630 घरकुलाचे अर्ज प्राप्त झाले असून, आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तात्काळ या अर्जाचा विचार करून गोरगरिबांना घरकुल देण्यात यावे, आदी मागण्यासाठी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती कल्याणी गजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. जर या मागण्याचा शासन दरबारी विचार झाला नाही, तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही शिंगणे यांनी दिला आहे. या प्रसंगी अनेक महिला उपस्थित होत्या.