बुलडाणा -विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून बहुतांश काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेला बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस नेत्यांच्या खेकडा वृत्तीमुळे गेल्या 15 वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे हे येथील विद्यमान आमदार आहेत.
जळगाव जामोद मतदारसंघाचा राजकीय इतिहास
जळगाव जामोद मतदार संघामध्ये भाजपचे कामगार कल्याण मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांचा पराभव करत बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या ताब्यात घेतला आहे. 1989 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले कृष्णराव इंगळे पहिल्यांदा या मतदारसंघांमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 1994 व 1999 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झालेत. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीमध्ये डॉ संजय कुटे यांनी कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला.
हेही वाचा... पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...
काँग्रेस मधून भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश केलेले प्रसेनजित पाटील, यांनी 2009 मध्ये भारिपकडून निवडणूक लढवली. यात पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहत त्यांचा अत्यल्प म्हणजे 4047 मतांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे रामविजय बुरुंगले हे दोन्ही पंचवार्षिकला तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग मानला जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस नेत्यांचा जास्त भरणा असून याठिकाणी काँग्रेस पक्षात अंतर्गत असलेली गटबाजी आणि खेकडा वृत्ती हीच भाजपच्या विजयाचे गमक असल्याचे बोलले जाते. तर काँग्रेसमधून पराभूत झालेले कृष्णराव इंगळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर भारिप-बहुजन उमेदवार असलेले आणि दुसर्या क्रमांकावर राहिलेले प्रसेनजित पाटील यांनी देखील काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भारिप बहुजनकडून पाटील यांना मिळालेली मते आणि आत्ताची वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती पाहता पाटील यांचा काँग्रेस प्रवेश हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
हेही वाचा... मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...
भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात केलेली विकास कामे त्याचबरोबर मतदारसंघातील आमदार डॉ. संजय कुटे यांनी पाठपुरावा करत केलेले 140 गाव पाणीपुरवठा योजना, शेगाव विकास आराखडा याच मुद्द्यावर भाजप मते मागणार आहेत. या मतदारसंघांमध्ये पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने तेरा वर्षात साडे चार हजार रुग्णांचा किडनी निकामी होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी या परिसरामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी आंदोलने केली गेलीत, मात्र अद्यापपर्यंत ते होऊ शकलेले नसून इतरही बाबतीत येथील आरोग्य यंत्रणा ढासळलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रमुख मुद्द्यांसह संत गतीने सुरू असलेला शेगाव विकास आराखडा, त्याचबरोबर अपूर्ण असलेली एकशे चाळीसगाव योजना आणि अंबाबरवा अभयारण्यातून आदिवासींचे पुनर्वसनात मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाच्या प्रश्नावर विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असून हे मुद्दे चर्चेची असणार आहेत.