बुलडाणा- जिगाव प्रकल्पासाठी टप्पे निहाय भूसंपादन व पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला विहीत पद्धतीनुसार भूसंपादन केल्याचा मोबदला मिळाला आहे. प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात येणारे व पुनर्वसन करावे लागणारे जुनी येरळी हे मोठे गाव आहे. त्यामुळे, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. संयुक्त मोजणीतून सुटलेल्या घरांचा मोबदला यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून विहीत कालमर्यादेत देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केल्या.
जिगाव प्रकल्पातील जुनी येरळी गावातील घरांच्या मोबदल्यासह विविध विषयासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी, पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. मोबदला देताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, गावात मोजणीत सुटलेल्या घरांची तातडीने मोजणी करावी. भूमी अभिलेख विभागाने यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. अशा घरांसाठी सरळ खरेदीने भूसंपादन करून विहीत कालमर्यादेत प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावा. यंत्रणांनी समन्वयाने काम करीत तातडीने प्रस्ताव सादर करावे. अतिक्रमित घरांसाठी यापूर्वी एखाद्या प्रकल्पामध्ये दिलेल्या मोबदल्याची प्रकरणे तपासावी. त्यानुसार कारवाई करावी.