बुलडाणा- कोरोना विरोधात बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्या झुंजीला यश आले आहे. आरोग्य यंत्रणेच्या पॉझिटिव्हीटीपुढे कोरोना निगेटिव्ह झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील 3 कोरोनाच्या रुग्णांना ठणठणीत बरे झाल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बुलडाणा जिल्हा सध्या तरी कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात 23 कोरोनाग्रस्त होते. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.
बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त बुलडाणा जिल्ह्यातील कोविड 19 रुग्णालयात आता एकही रुग्ण उपचार घेत नाही. त्यामळे बुलडाण्याची वाटचाल ही ग्रीन झोनकडे होत असल्याने जिल्हा पोलीस डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी नागरिकांना शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 23 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 20 रुग्ण कोरोनापासून बरे होवून घरी परतले होते. तर बाकीच्या 3 कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनाचे लक्षण आढळून न आल्याने नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना आरोग्य विभागाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुन्या मार्गदर्शक सूचनेनुसार तीनही रुग्णांचा 14 दिवसानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला 7 दिवसांदरम्यान सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास नसल्यास त्याल्या रुग्णालयातून सुट्टी देण्यात यावी. यानंतर या रुग्णांवर 7 दिवस आरोग्य विभाग लक्ष ठेवून राहणार आहे. दरम्यान, त्यांना कोरोनाचे लक्षणं आढळल्यास पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. या नवीन सूचनेनुसार 3 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.