बुलडाणा -शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविली जाणारी वऱ्हाडातील सुमारे शेकडो वर्षांपासूनची जुनी परंपरा असलेली अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी बुलडाण्यातील भेंडवळ येथील घटमांडणी यावर्षी राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने मांडणीचे भाकीत मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये जाहीर केली जाणार आहे. तर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडवळ येथे घटमांडणीकरिता येऊ नये, असे आवाहन चंद्रभान महाराजांचे वंशज शिवाजी पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी केले आहे.
देशातील सर्वच विषयावर होते भविष्यवाणी
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपूर्वी येथील वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात. पिढ्यांपिढ्यापासून हे भाकीत खरे ठरत असल्याचा दावा शेतकरी करीत असल्याने या मांडणी व भाकितावर जनतेने विश्वास ठेवला आहे.
यावर्षी १५ तारखेला होणार मांडणीचे भाकीत
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत ऐकण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावर्षी अक्षयतृतीयेच्या दिवशी म्हणजेच १४ मे रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत १५ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून शेतकरी व नागरिक येत असल्याने मोठी गर्दी होते. मात्र जिल्ह्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा जाहीर कार्यक्रम यावर्षी मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये केला जाणार आहे. प्रसारमाध्यमांद्वारे भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडवळ येथे घटमांडणीकरिता येऊ नये, असे आवाहन पुंजाजी महाराज वाघ, सारंगधर महाराज वाघ यांनी केले.