बुलडाणा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता रुग्णांच्या सोयीसाठी शेगाव, खामगाव व देऊळगावराजा या तीन ठिकाणी प्रत्येकी २० खाटांची व्यवस्था करुन कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपाययोजना, खबरदारी तसेच पुरवण्यात आलेल्या सुविधा यांबद्दल माहिती देण्यात आली. संबंधित बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे उपस्थित होते.
देऊळगावराजा, शेगाव, खामगावात नवीन क्वारंटाईन सेंटर्स - lockdown in buldana
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता रुग्णांच्या सोयीसाठी शेगाव, खामगाव व देऊळगावराजा या तीन ठिकाणी प्रत्येकी २०-२० खाटांची व्यवस्था करुन कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
यावेळी पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या बाधितांसाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगितले. शेगाव, खामगाव व देऊळगावराजा येथील कोरोनाबाधितांना व संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यात येते. त्यामुळे यंत्रणेवर मोठ्याप्रमाणावर ताण येत असल्याने या तीनही ठिकाणी कोरोना रुग्णालय स्थापन करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या रुग्णालयासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक अतिरिक्त डॉक्टर्स व सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीमे तत्काळ भरती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या काळात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात औषधे, मास्क व पीपीई किट्सदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १७ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही, असे पालकमंत्री म्हणाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर निश्चितच आपण या कोरोनाला हरवू, असा विश्वास शिंगणे यांनी व्यक्त केला.