महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय पथकाची ७ मिनिटांची अजब पाहणी; ९० टक्के नुकसानग्रस्त सोयाबीनकडे दुर्लक्षच - National Disaster Management Authority Team Buldana

केंद्रीय पथकाने आज चिखली तालुक्यातील केळवदमध्ये ७ मिनिटात अजबच पाहणी केली. केळवद भागात ८० ते ९० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पथकाने या भागात केवळ खराब झालेल्या ज्वारीचीच पाहणी केल्याचे समोरी आले आहे.

केंद्रीय पथक

By

Published : Nov 24, 2019, 5:30 PM IST

बुलडाणा- सतत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे केंद्रीय पथक शनिवार (२३ नोव्हेंबर) पासून दौऱ्यावर आहे. केंद्रीय पथकाने आज चिखली तालुक्यातील केळवदमध्ये ७ मिनिटात अजबच पाहणी केली. केळवद भागात ८० ते ९० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पथकाने या भागात केवळ खराब झालेल्या ज्वारीचीच पाहणी केल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्याशी चर्चा करताना केंद्रीय पथकाचे अधिकारी

विशेष म्हणजे, या अगोदर ७ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांनी ज्या ठिकाणाची पाहणी केली होती, त्याच केळवद येथील शेतात केवळ ७ मिनिटात केंद्रीय पथकाने पाहणी करून काढता पाय घेतला. तर, केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी निरुपमा डांगेसह निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली. यामुळे शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण (एनडीएमए) पथकाचे अधिकारी शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यामध्ये शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. या पथकाचे नेतृत्व कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आर.पी सिंह हे करत आहे. पथकाने आज चिखली-मेहकर तालुक्यातील गावांमध्ये नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यात बुलडाणा-चिखली हायवेवरील केळवद गावाजवळील हायवे लगतच्या पाटील यांच्या शेतातील नुकसान झालेल्या ज्वारीची पाहणी केली.

यावेळी पथकाचे नेतृत्व करणारे कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आर.पी सिंह यांनी शेतकरी आदित्य पाटील यांची फक्त औपचारिक पद्धतीने विचारपूस केली आणि केवळ ७ मिनिटात पिकांची पाहणी केली. यावेळी सिंह यांनी शेतकरी पाटील यांना आपण किती एकर शेती पेरली होती, किती खर्च झाले, किती नुकसान झाले याबाबत काहीच न विचारता फक्त हिंदीमध्ये तुम्ही ज्वारी कश्या पद्धतीने काढता, ज्वारीचे कन्स वरून कापता की खालून कापता हे विचारून काढता पाय घेतला.

विशेष म्हणजे याच शेतात मागील 7 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी देखील नुकसान झालेल्या ज्वारीची पाहणी केली होती. यावेळी केळवद भागात ८० ते ९० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून केंद्रीय पथकाने केवळ नुकसान झालेल्या ज्वारीचीच पाहणी केली. व नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे याच मार्गावर काही अंतरावर असलेल्या अंत्रितेलीतील शेतकरी विजय सातपुते व शेतकरी योगश पाटील यांनी पथकाच्या पाहणीवर आक्षेप व्यक्त केला आहे.

शेतकरी सातपुते यांच्या शेतातील सोयाबीन काढणीनंतर पूर्ण खराब झाली आहे. तर केळवद गावातील शेतकरी योगेश गजानन पाटील यांच्या ५ ऐकर शेतातील सोयाबीन काढणी पश्चातच खराब झाली आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर आक्षेप नोंदवत शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदत प्रति हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. केळवद जवळील शेतात केंद्रीय पथकासोबत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी-अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा कृषी अधिक्षक नरेंद्र नाईक, यांच्यासह आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यावेळी जिल्हाधिकारी निरुपमा डांगेसह निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांची अनुपस्थिती होती.

केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबतच्या मागणीचा शेतकरी नेत्यांना विसर

शेतकरी नेत्यांना देखील केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून वाढीव मदत देण्यासंबंधी मागणी करण्यासंदर्भात विसर पडल्याचे समोर आले आहे. गेल्या २३ नोव्हेंबर पासून केंद्रीय पथक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करीत आहे. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यासंबंधी पथकाला मागणी केली नसल्याने ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. राज्यपालांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८ रुपये मदतीची घोषणा केली आहे. यावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही न निघण्याचे वास्तव आहे.

हेही वाचा-राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाच्या पथकाकडून नुकसान पाहणीचा फार्स

ABOUT THE AUTHOR

...view details