बुलडाणा- मुस्लिम बांधवामध्ये रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मस्जिदमध्ये नमाजसाठी जात असतात. पण सद्या कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. यामुळे मुस्लिम बांधव आपापल्या घरीच नमाज अदा करुन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले आहेत.
मुस्लिम समाजात पवित्र रमजान महिन्याला सर्वात जास्त महत्व आहे. या महिन्यात आपल्या 'अल्लाह'ला मनविण्यासाठी पूर्ण एक महिना उपवास (रोजा) ठेवून अल्लाहची प्रार्थना केली जाते. मुस्लिम बांधव भल्या पहाटे जेवण करून (सहेरी करून) नंतर खाने-पीने बंद करून दिवसभर उपाशी राहून, प्रार्थना करतात आणि संध्याकाळी ते उपवास सोडतात. या दिवसभरात मुस्लिम बांधव एकत्र येऊन ५ वेळेची नमाज मस्जिदमध्ये पठण करतात. तर सायंकाळी तरावीहच्या विशेष नमाजाचे पठणही केलं जातं.