बुलडाणा -नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगरसेविकेने आपल्या घरातील साफ सफाई आणि कपडे धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कर्मचारी खामगाव नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी या पदावर कार्यरत असून त्याचे नाव राकेश बहुनिया असून तो सतीफैल भागातील रहिवासी आहे. सतीफैल भागातील भाजप नगरसेविका लता गरड यांच्या घरात हा कर्मचारी कपडे धुत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने या सफाई कर्मचाऱ्याचा शोध घेऊन हे प्रकरण उघड केले आहे.
धक्कादायक! नगरपरिषद कर्मचाऱ्याला करावे लागते नगरसेविकेच्या घरातील घरकाम; बुलडाण्यातील खामगाव नगर परिषदेतील प्रकार हेही वाचा -शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयात मिळणार पोटभर जेवण; नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम घोषित
राकेश बहुनिया हा खामगाव नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी या पदावर काम करत असून तो राहत असलेल्या सतीफैल भागातील नगरसेविका लता गरड यांच्या घरात त्याला घरकाम करावे लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्याशी याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, पालिकेतील आरोग्य विभातील शिपाई संजय तांबोले हा त्याला हे काम करण्यास सांगायचा आणि काम केले नाही तर गैरहजेरी लावून कामावरून निलंबित करण्याची धमकी द्यायचा. राकेश काम करत असलेल्या सतीफैल भागाच्या नगरसेविका लता गरड यांच्या घरचे साफ सफाई आणि घरकाम करण्याचे काम तांबोले हा राकेश याला सांगत होता. यासंदर्भात तांबोलेवर कारवाई करण्याची मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे.
हेही वाचा -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा
यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी धनंजय बोरिकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी माझ्यापर्यंत हा व्हिडिओ आला असून लेखी तक्रार आल्यावर आपण यावर कारवाई करू, असे म्हटले आहे. याप्रकरणी गरड यांच्या मुलाने आमच्याकडे कोणीही सफाई कर्मचारी काम करत नसून हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे म्हटले आहे. नगर परिषद १९६५ च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय पदाधिकारी यांच्या घरी घरकाम करण्यासाठी वापरले गेले, तर संबंधितावर कारवाई करण्याची तरतूद आहे. आता या प्रकरणात संबंधित दोषींवर काय कारवाई होते, हे पहावे लागेल.