बुलडाणा -सध्या देशासह राज्यतही कोरोनाचे संकट येऊन ठेपले आहे. या कोरोना युद्धात अनेक योद्धे कोरोना फायटर्स म्हणून कार्य करीत आहेत. या युद्धात राज्यात अनेक मदर्सदेखील आपला लढा देत आहेत. बुलडाण्याच्या एका अधिपरिचारिका असलेल्या मदर्सदेखील आपल्या एका वर्षाच्या बाळाला आपल्यापासून दूर ठेवून चक्क कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत तत्परतेने कर्तव्य पार पाडत आहेत. चला बघूया जागतिक मातृदिनाच्या दिवशी याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट.
मातृदिन विशेष : स्वत:च्या एका वर्षाच्या बाळाला दूर ठेवून बुलडाण्याच्या राजश्री पाटील कोरोनाग्रस्तांची करतायेत सेवा - बुलडाणा विशेष बातमी
कोरोनाबाधित रुग्णांची सेवा देण्याकरिता कोविड-19 रुग्णालय अधिपरिचरिका राजश्री पाटील यांची ड्युटी 4 मेपासून लावण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी ज्यांची ड्युटी लावण्यात येते ते ड्युटी पूर्ण होईपर्यंत आपल्या परिवाराला भेटू शकत नाहीत.
राजश्री मयूर पाटील ह्या गेल्या तीन वर्षांपासून बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचरिका पदावरून रुग्ण सेवा देत आहेत. त्यांचे निवासस्थान बुलडाण्याच्या गणेश नगरमध्ये आहे. देशभरासह राज्यात कोरोना संकट आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एक व्यक्तिचा मृत्यू झाला असून 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातून 20 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरीही गेलेले आहेत. सद्यस्थितीत 3 कोरोनाबाधीत रुग्णांचे उपचार बुलडाण्याच्या कोव्हिड-19 रुग्णालयात सुरू आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांची सेवा देण्याकरिता कोविड-19 रुग्णालय अधिपरिचरिका राजश्री पाटील यांची ड्युटी 4 मे पासून लावण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या सेवेसाठी ज्यांची ड्युटी लावण्यात येते ते ड्युटी पूर्ण होईपर्यंत घरी किंवा आपल्या परिवाराशी भेटू शकत नाहीत. अशातच राजश्री यांना 1 वर्षाचा बाळ असूनही आपल्या मार्तृत्वाला बाजूला सारून त्याची देखभाल व संगोपन करण्यासाठी त्यांनी आपले पती व आपल्या आईजवळ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती त्यांनी त्यांच्या पती मयूर व आईला दिली.
राजश्री यांनी आपल्या एका वर्षाच्या राजवीरला शहरातील कऱ्हाळे लेआऊटमध्ये राहणाऱ्या आपल्या आईजवळ संगोपनासाठी देऊन आपला जीव धोक्यात घालून गेल्या 4 मेपासून त्या मूकबधीर वसतीगृहात असलेल्या कोव्हिड 19 रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत एका कोरोना फायटर्सचे कर्तव्य पार पाडत आहेत. डॉक्टर्स आणि अधिपरिचरिकांना कृष्णा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचठिकाणी राजश्रीदेखील राहत आहेत. अनेकदा राजश्री राजवीरसोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलत असतात. त्याची विचारपूस करीत असतात. यावेळी त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. राजवीरचे संगोपन करण्यासाठी त्यांचे पती मयूरदेखील राजश्री यांच्या आईच्या घरी जातात. आत्तापर्यंत राजश्री यांनी कोविड-19 रुग्णालयात 7 दिवसांच्या ड्युटीमध्ये 12 तासांच्या दोन वेळा नाईट ड्युटीदेखील केल्या आहेत. अशा कोरोनाबाधित रुग्णांकडे 7 दिवस ड्युटी केल्यानंतर आत्ता राजश्रींना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले जाईल. कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत 3 शिफ्टमध्ये रेग्युलर 5 ते 6 डॉक्टरांसह 10 इंचार्ज, 10 ब्रदर्स आणि 30 अधिपरिचरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.