बुलडाणा -सततच्या भांडणाला कंटाळून माय लेकाने धारदार शस्त्राने वार करून 45 वर्षीय वडिलाचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथे रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मायलेकास अटक केली आहे.
दारूच्या व्यसनामुळे दररोज उडत होते परिवारासोबत खटके -
बाबाजान नाना शेगर याने बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गावातीलच त्याचा भाऊ जगन नाना शेगर यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे परिवारासोबत नेहमी खटके उडत होते. मागील दोन महिन्यापासून जगन शेगर हा जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे दररोज पत्नी वमुलासोबत भांडण होत होते. दरम्यान, रविवारी ६ डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जगन हा जास्त दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे मुलगा व पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी त्याचा मुलगा राजेंद्र जगन शेगर याने त्याची आई मंदाबाई जगन शेगर यांच्या मदतीने वडील जगन शेगर यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. घाव वर्मी लागल्याने व रक्तस्त्राव जास्त झाल्याने जगन शेगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.