बुलडाणा - विधानसभा निवडणुकीतील बंडोबांना थंड करताना सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यांना भविष्यातील राजकीय ‘गणिते’ देऊन शांत करण्यात अनेक नेत्यांना बऱ्यापैकी यश आले. मात्र, काही बंडोबा नेत्यांची विनंती झुगारून निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. युती धर्म पाळून शेतकरी कामगार पक्षाच्या घाटाखालील उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
हे वाचलं का? - पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या काही बंडोबांना थंडोबा व्हावे लागले. यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारलेले सहकार नेते प्रसन्नजीत पाटील यांनी आपल्या लोकप्रियतेच्या भरवशावर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. ३ वर्षांपूर्वी पाटील यांची काँग्रेस पक्षात घर वापसी झाली झाली होती. त्यावेळी त्यांना २०१९ मध्ये जळगाव जामोद मतदार संघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच बंडाचे निशाण रोवले होते. वेगळ्या बैठक घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पाटील यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यावेळी त्यांच्या चाहत्या वर्गाने काँग्रेस पक्षविरोधात रोष व्यक्त केला. पाटील यांनी उमेदवारी कोणत्या अटीवर मागे घेतली? हे अजून स्पष्ट झालेले नाही.