बुलडाणा - जिल्हयातील विवीध आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत विविध कंपन्याचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 24 एंड्राईड मोबाईल व एक दुचाकी असा एकुण दोन लाख 54 हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
जिल्ह्यातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरी
मागील काही दिवसांपासुन जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यासाठी पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्यासाठी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सायबर पोलीसांच्या माहिती आधारे पकडला आरोपी
या आदेशावरून विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान गुरुवारी सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी दोन्ही चोरीचे मोबाईल आरोपी निलेश जगन शिंदे याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. या माहितीवरून पथकाने निलेश जगन शिंदे यास ताब्यात घेवून त्याची विचारपुस केली. त्यावेळी जिल्हयातील विविध आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत विविध कंपन्याचे 24 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने त्याच्या ताब्यातून महागडे 24 एंड्राईड मोबाईल व एक दुचाकी असा एकुण दोन लाख 54 हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी चिखली पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक निलेश शेळके,श्रीकांत जिंदमवार,प्रदीप आढाव, पोलीस अंमलदार संजय मिसाळ, गजानन आहेर, भारत जंगले, विजय सोनोने, विजय वारुळे व सायबर पोलीस कर्मचारी अंमलदार राजू आडवे व कैलास ठोंबरे यांनी केली आहे.
हेही वाचा -Dry Run : देशभरासह महाराष्ट्रात आज कोरोना लसीचे ड्राय रन