कोल्हापूर : राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत निर्णय होतो. दिल्लीच्या मनात काय आहे यावर सर्व गोष्टी ठरतात, अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या बॅनरवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असून विरोधक सरकारला विविध प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, असे शासनाने ठरवले आहे. अनुदानाचा विषय असो किंवा शिक्षक भरतीचा. अद्याप शिक्षक भरती झाली नाही. अनेक विषय आहेत, ज्यांना बगल देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.
विरोधक आमदारांना शून्य टक्के निधी : विरोधीपक्षाच्या आमदारांना शून्य टक्के निधी देणे, हा बजेटमध्ये झालेला अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. राज्याच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. मात्र, विरोधक आमदारांना निधी सरकार देत नाही. सध्याचे सरकार हे केवळ 200 मतदार संघातील सरकार असल्यासारखे वाटत आहे, असे पाटील म्हणाले. सरकार सत्ताधारी आमदारांना 100 टक्के देते आहे, तर विरोधकांना शून्य टक्के निधीचे धोरण सरकारचे असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.