बुलडाणा -गुरूवारी राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. निवडून आलेले बहुसंख्य आमदार आणि कार्यकर्ते विजयाचा आनंद घेत आहेत. मात्र, याला बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अपवाद आहे. 24 ऑक्टोबरला निवडून आल्यानंतर त्यांनी सत्कार समारंभात न रमता परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे योग्य समजले. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी बुलडाणा तालुक्यातील वरवंड व डोंगरखंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेतली.
विजयाच्या जल्लोषात न रमता, आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पहाणी केली वरवंड आणि डोंगरखंडाळा येथील शेतीची पाहणी केल्यानंतर गायकवाड यांनी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच बुलडाणा-मोताळा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
हेही वाचा... मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश ऐकडे विजयी; भाजपचे चैनसुख संचेतींचा धक्कादायक पराभव
गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाही मागील चार दिवसापासून बुलडाणा व मोताळा तालुक्यातील वरवंड, डोंगरखंडाळा, भादोला आदी परिसरातील हजारो हेक्टर शेतीमध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन, ज्वारीच, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ज्वारी आणि सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आले होते, तेही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.
हेही वाचा... एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक, तर खामगावात विजयी मिरवणुकीची तयारी
आमदार संजय गायकवाड यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय कृषी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वे करावा. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला असेल, त्या त्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, असे निर्देश गायकवाड यांनी दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देऊन दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी घुगे यांना सादर केले.
हेही वाचा... 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स