बुलडाणा:अमरावती मतदारसंघात एकूण पाच जिल्हे असून अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. या जागेसाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. तसेच २ लाख ६ हजार १७२ मतदार असून मतदान हे १ लाख २ हजार ४०३ इतके झाले. त्यात ८ हजार ३८७ मते अवैध ठरली. ९४ हजार २०० मते वैध ठरली. मतांचा कोटा ४७ हजार १०१ इतका असून तो कुणीही गाठू शकले नाही. त्यामुळे सुरुवातीला अवैध ठरलेल्या मतांचे फेर अवलोकन मागणीवरुन या मतांची फेरमोजणी झाली. अखेर मतांचा कोटा कुणीही पूर्ण करू शकले नसल्यामुळे ज्यांना जास्त मते त्यांना विजयी केले. धीरज लिंगाडे (महाविकास) यांना ४६ हजार ३४४ तर डॉ. रणजीत पाटलांना (भाजप) ४२ हजार ९६२ मत मिळाली आहेत. तर उर्वरित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मत घेतल्याने पाटलांना फटका बसला. अन् लिंगाडेंनी ३ हजार ३८२ मतांनी आघाडी घेत बाजी मारली. दरम्यान, मतमोजणीसाठी २८ टेबलांची व्यवस्था आणि २८ पथकांची नियुक्ती होती.
कमी मतदानाचा फटका :अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी तब्बल १३.०५ टक्के घसरली. अमरावती विभागात ४९.६७ टक्के मतदान झाले असून २०१७ च्या निवडणुकीत ६३.५० टक्के मतदान झाले होते. या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका डॉ. रणजीत पाटलांना बसला. कारण, यंदा अमरावती विभागातील ५८.८७ टक्के हे सर्वाधिक मतदान यवतमाळ जिल्ह्यात झाले. तर अमरावतीमध्ये ४३.३७ टक्के, अकोलामध्ये ४६.९१ टक्के, बुलडाणामध्ये ५३.०४, वाशिम ५४.८० टक्के मतदान झाले होते.