बुलडाणा - राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी रविवारी संतनगरी शेगावात पोहोचून 'श्रीं'चे दर्शन घेतले. यावेळी प्रहार जनशक्ती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे अकोल्यात आल्यानंतर रविवारी दर्शनासाठी शेगावात पोहोचले होते. रविवारी दुपारी एक वाजता संतनगरी शेगावात पोहोचून त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी माथा टेकला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत कर्मयोगी भाऊंशी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शाल व श्रीफळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्थ निळकंठदादा पाटील यांनी संस्थांच्या कारभाराची माहिती यावेळी त्यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष निलेश घोंगेसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यानंतर मातंगपुरी परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.