बुलडाणा - खामगाव शहरातील टिचर कॉलनीत सुरू असलेल्या मांऊट सिनाई इंग्रजी शाळेचे शिक्षण विभागाच्या परवानगीविना स्थंलातर करण्यात आले आहे. सध्या एका भाड्याच्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे. ही इमारत धोकादायक असल्याने शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश दिले होते. कारणे दाखवा नोटीशीला शाळा प्रशासनाने उत्तर न दिल्याने आता सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मोहमद इमरान मोहमद इकबाल आणि मोहमद इरफान मोहमद इकबाल यांनी ही शाळा अनअधिकृतपणे चालवली जात असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे केली होती. मांऊट सिनाई शाळा गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या शाळेला मान्यताही आहे. मात्र, मान्यता असलेल्या ठीकाणी शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने शाळा तात्पुरत्या स्वरूपात टिचर कॉलनीत हलवण्यात आली होती. यासाठी एक इमारत भाड्याने घेण्यात आली आहे.