बुलडाणा- महार रेजिमेंटचे जवान कैलास भारत पवार हे सियाचीन येथे आपले कर्तव्य बजावताना असताना बर्फाळ डोंगरावरुन पाय घसरुन पडल्याने त्यांना वीरमरण आले होते. ते मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी होते. बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) चिखली शहरातील तालुका क्रिडा संकुलच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीर जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आल्याची माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला 1 ऑगस्टला कळविण्यात आली होती. बुधवारी (4 ऑगस्ट) वीर जवान कैलास पवार यांचे पार्थिव त्याच्या मुळगाव असलेल्या चिखली येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरापासून ते तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी भारत माता की जय.., अमर रहे अमर रहे वीर जवान कैलास पवार अमर रहे.., वंदे मातरम्... अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी रस्त्यांवर वीर कैलास पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारे बॅनर लावले होते. ज्या मार्गाने अंतयात्रा रवाना झाली. त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती.