बुलडाणा : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली असून या बसमधील 26 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. हा अपघात सिंदखेडराजा जवळ घडला असून ही बस नागपूरवरुन पुण्याकडे जात होती. मात्र सिंदखेडराजाच्या जवळ या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 25 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटून बस खांबाला धडकली :नागपूरवरुन पुण्याला जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटून बस खांबाला धडकली. त्यानंतर झालेल्या अपघातात तब्बल 25 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने आपल्या ताफ्यासह दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत :नागपूरवरुन पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस खांबाला धडकून झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास पिंपळखुटा गावाजवळ घडली. अपघातात 25 प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली.
एका चालकाचाही अपघातात मृत्यू :विदर्भ ट्रॅव्हलस्ची ही बस नागपूरवरुन पुण्याला जात होती. यावेळी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बससोबत दोन चालक होते. त्यापैकी एका चालकाने कारंजापर्यंत बस चालवत आणली. त्यानंतर दुसऱ्या चालकाने बसचा ताबा घेतला. त्यानंतर ही बस सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे आल्यानंतर बसचा भीषण अपघात झाला. या बसमध्ये एक चालकही ठार झाला आहे. तर दुसरा चालक थोडक्यात बचावला आहे.