बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील पळसी झांसी येथील शंकरगिरी महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारोठाची निर्मिती करण्यात आली. ९ क्विंटल वजनाच्या या महाप्रसादाचे मंदिर प्रशासनाकडून वितरण करण्यात येत आहे. १२८ वर्षांची ही परंपरा आजतागायत कायम आहे.
पळसी झांसी येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त शंकरगिरी महाराज यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तपस्वी शंकरगिरी महाराजांनी सुरू केलेली रोठ बनवण्याची परंपरा आजही स्थानिक जपत आहेत. या महारोठाच्या सेवनाने सुख, शांती प्राप्त होवून आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
हेही वाचा -पेन्सिलीच्या टोकावर शिवलिंग साकारणारा अवलिया; पाहा व्हिडिओ
११ मीटर सुती कापड आणि त्यावर केळीची पाने लावून रात्रभर हा महारोठ तयार करण्यात आला. महाशिवरात्रीला रात्री ९ वाजतापासून ३० ते ४० भाविकांनी हा महारोठ बनवला. तत्पूर्वी महाराजांनी ठरवलेल्या जागेवर रानगोवऱ्याचे जगरे महाराजांच्या धुनीतून पेटविण्यात आले. नंतर रोडगे तयार करायला सुरूवात करण्यात आली. याचे एक एक किलोचे गोळे एका पितळी डेगमध्ये आणि कोपरात जमविण्यात आले. हे सर्व गोळे केळीच्या पानावर ११ मीटर कोऱ्या कापडावर एकावर एक रचण्यात आले. आज शनिवारी पहाटे हा महारोठ तयार झाला. हा ९ क्विंटल वजनाचा महाकाय महारोठ घट्ट केळीच्या बंधाने बांधून रान गोवऱ्याच्या विस्तवात भाजण्यासाठी ५ तास ठेवण्यात आला होता. दरवर्षी या रोठाचे वजन वाढवण्यात येत आहे.
हेही वाचा -VIDEO: पाहा.. का करतात 'या' गावात महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा