महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेस जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया बुलढाणा :शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावर राज्यातील एक मोठा अपघात खाजगी बसला झाला. त्यामध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती यंत्रणेकडे जाणून घेतली. समृद्धी मार्गावर काय उपाय योजना करता येतील, यावर निश्चित विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पण त्यानंतर लगेचच राज्यात रविवारी एक राजकीय भूकंप घडला.
बुलढाण्यात अपघातातील मृतकांवर अंत्यसंस्कार : राष्ट्रवादीचे अजित पवार व त्यांचे 30 ते 35 आमदार भाजप शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झाले. यावर आता काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे की, शनिवारी राज्यामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर त्यावर सरकारला उपाययोजना करण्याकरता वेळ नाही. पुन्हा भाजप व शिंदे सरकारने एकीकडे बुलढाण्यात अपघातात मृत पावलेल्यांची चिता जळत असताना ती शांत होण्यापूर्वीच हा शपथविधीचा घाट का घातला? असा महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेसच्या जयश्री शेळके यांनी विचारला आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : रविवारी दुपारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनी देखील शपथ घेतली. सध्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्यासह अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करणार आहेत. अजित पवारांनी 3 वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु बुलढाणा अपघाताच्या खुणा ताज्या असतानाच सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेसकडून टीका होत आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : शरद पवार आज प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेणार दर्शन, जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता
- Maharashtra Political Crisis : जे गेले ते स्वेच्छेने गेले, राज्यातील जनता शरद पवारांसोबत - महेश तपासे
- NCP Political Crisis: अजित पवारांच्या बंडाच्या निशाण्यानंतर रोहित पवार भावूक म्हणाले... राजकारणात येऊन चूक केली का?