बुलडाणा -हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सव भारतात एकमेव याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यात ५५ वर्षांची महाप्रसादाची आणि 'महापंगतीची' परंपरा कायम ठेवत स्वामी विवेकानंद यांची १५७ वी जयंती साजरी केली गेली. यावेळी एकाच ठिकाणी एकाच वेळी लाखो भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून महापंगतीचे दर्शन घडले. या महापंगतीची 'गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड'मध्ये नोंद घेण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'महापंगती'चे आयोजन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी शुकदास महाराज यांचे विवेकानंद आश्रम असून येथे स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सतत ३ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येते. तर, शेवटच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी आश्रमाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
हेही वाचा - 'मोदींनी #CAA लागू केल्यास, जसं इंग्रजांविरोधात जनतेने असहकार पुकारला तसंच आंदोलन आताही होईल'
या महाप्रसादाची तयारी सतत २ दिवस चालते. ४० एकर शेतामध्ये जवळपास २ लाखाच्या वर भाविकांनी दोन्ही बाजूनी शिस्तबद्ध बसून पुरी-भाजीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावर्षी १५१ क्विंटल गहुपासून पुरी, १०१ क्विंटल वांगीची भाजी आणि पन्नास पंगतीला १०० ट्रक्टर आणि ३००० स्वयंसेवकांच्या माध्यमातून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
गेल्या 55 वर्षांपासून एकाच महापंगतीत २ लाखांच्या वर शांततेत महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांच्या या पंगतीचे 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्डम'ध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - देशाच्या जडणघडणीत हिंदुसोबत मुस्लीमांचेही योगदान - अबू आजमी