बुलडाणा- प्रेमी युगुलाला समज दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या नातेवाईकाचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. ही घटना मासरुळ येथे उघडकीस आली असून याप्रकरणी प्रियकरासह त्याच्या साथिदारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुमार अनूप सोनवणे असे त्या बेड्या ठोकलेल्या प्रियकराचे तर करण शेळके असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे. तर स्वप्निल भूते असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्वप्नील भुते याच्या नात्यातील मुलीसोबत कुमार सोनवणे याचे प्रेमप्रकरण होते. याची कुणकुण स्वप्नीलला लागली होती. काही दिवसापूर्वी त्याने आरोपी कुमार सोनवणे याला समजावून सांगितले. मात्र त्याने हो हो म्हणत त्याकडे कानाडोळा करत सदर मुलीचा पिच्छा सोडलाच नाही. त्यामुळे स्वप्नीलने आपल्या नातेवाईक मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपले कुटूंबीय वारकरी संप्रदायातील आहे. अशा प्रकरणामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल, असा समज स्वप्नीलने मुलीला दिला. मात्र, सदर मुलीने ही माहिती आपला प्रियकर कुमार सोनवणे याच्या कानावर घातली. आता माझ्या घरी आपल्या प्रेमाची माहिती कळली आहे. त्यामुळे मला आता जीव दिल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे तिने त्याला सांगितले.
प्रियकर कुमार सोनवणेने त्यानंतर आपला मित्र करण शेळकेला सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ गाठले. तेथे त्याने स्वप्नीलला ‘तुझ्या नात्यातील मुलीचा मी नाद सोडला’ असे खोटे सांगितले. त्यानंतर त्याला चल फिरायला जाऊ, असे म्हणत दुचाकीवरुन त्याला भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आणले. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पारध पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी श्रीरंग सुरडकर यांच्या शेतात दोन्ही आरोपींनी मद्यपान केले. दारुची झिंग चढल्यावर दोघांनी सदर मुलीच्या प्रेमप्रकरणावरुन स्वप्नीलशी वाद घातला. त्याला लाकडी राफ्टरने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याला ठार केले. स्वप्निलचा खून केल्यानंतर त्यांनी घटनस्थळावरून पोबारा केला.
सुरडकर यांच्या शेतात तरुणाचा मृतदेह असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पारध पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले. यात पारध पोलिसांना स्वप्नलीच्या नात्यातील मुलीच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला. त्यावरून बारकाईने तपास करत पारध पोलिसांनी दोन्ही आरोपींना तीन दिवसातच बेड्या ठोकण्यात यश मिळविले.
पोलिसांनी प्रियकर कुमार अनूप सोनवणे याला त्याच्या बुलडाणा येथील घरुन बुधवारी अटक केली, तर दुसरा आरोपी करण शेळके ( रा. सव ) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही मारेकरी महाविद्यालयीन तरुण आहेत. मात्र त्यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या स्वप्नीलचा निर्घृण खून केल्याची माहिती पारध पोलिसांनी दिली.