बुलडाणा - बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील शेतकऱ्याकडून गाईचे कृत्रिम रेतन करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्क व्यतिरिक्त जादा पैशांची मागणी करणाऱ्या हतेडी केंद्राचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे यांना पुढील आदेशपर्यत निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी एका आदेशाने केली आहे. यामुळे शासनाकडून ठरवून दिलेल्या शुल्क व्यतिरिक्त जादा पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
माहिती देताना जिल्हा पशू संवर्धन अधिकारी, बुलडाणा हेही वाचा -बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये वाद; हवेत गोळीबार
ईटीव्ही भारतच्या बातमीची घेतली दखल -
अंभोडा येथील शेतकरी गुलाबराव पवार यांनी त्यांच्या जवळील गाईचे कृत्रिम रेतन (गर्भधारणा) करण्यासाठी हांगे यांनी जादा पैसे मागितल्याचा व्हिडिओ समोर आणला होता. ईटीव्ही भारतने याबाबत 3 ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित केली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
काय आहे प्रकार -
अंभोडा येथील शेतकरी गुलाबराव पवार हे त्यांच्या जवळील गाईचे कृत्रिम रेतन (गर्भधारणा) करण्यासाठी पशू वैद्यकीय हतेडी केंद्रात शनिवारी 31 जुलै रोजी गेले होते. मात्र केंद्रात पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे उपस्थित नव्हते. फोनवर बोलल्यानंतर डॉ. वसंत हांगे हे अंभोडा आले व त्यांनी गाईचे कृत्रिम रेतन केल्यानंतर शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या 41 रुपयांच्या शुल्का व्यतिरिक्त जादा 550 रुपयांची मागणी केली. त्यावरून गुलाबराव पवार यांनी त्यांच्याजवळील 300 रुपये दिले व उरलेले 250 रुपये उधार ठेवले. मात्र, पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांसमोर आणला होता. तर, पशू वैद्यकीय हतेडी केंद्राला जोडलेली गावांतील शेतकऱ्यांकडून पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे अशाचप्रकारे अधिकचे शुल्क घेत असल्याचा आरोप देखील पवार यांनी केला होता.
चौकशी दरम्यान दाखल जबाबानंतर निलंबन -
या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान डॉ. वसंत हांगे यांनी जबाब दाखल केला की, त्यांनी गाईचे केलेले उपचार व वाहनासाठी लागणारे डिझेलचे पैसे घेतले आहे. त्यामुळे, चौकशी होईपर्यंत डॉ. वसंत हांगे यांना मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी दिवाकर काळे यांनी दिली आहे.
हेही वाचा -बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा, स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बैलगाडी मोर्चा