बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४ मे पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले असून यामध्ये काही नियमांसह दारू दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शासनाद्वारे जारी करण्यात आलेले पत्रक ६ मेपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सीलबंद दारूची दुकाने सुरू करता येणार आहे. तर, शहरी भागात नगरपरिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील दारुची दुकाने चालू करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ दारू विक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्याकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आजपासून उघडणार सीलबंद दारू विक्रीची दुकाने या नियमांसह दारूंची दुकाने उघडता येणार आहेत. सीलबंद दारूविक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर राखणे अनिवार्य असणार आहे. त्याकरता दुकानासमोर प्रत्येक सहा फुटांवर वर्तुळ आखून घ्यावीत. दुकान सभोवतालचा परीसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहणार आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहील. उघडलेल्या मद्य विक्रीच्या दुकानामध्ये कोणत्याही परिस्थितीत दारू प्राशन होणार नाही, याची संबधित मद्य विक्रेत्याने दक्षता घ्यावी. अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा कोणत्याही दुकानाने सदर मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान तत्काळ बंद करण्यात येईल व त्याच्याविरूद्ध प्रचलित कायद्यातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रत्येक किरकोळ सीलबंद दारू विक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावण्यात यावा. त्यावर दुकानाच्या सुधारित वेळा, सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे, दुकानात दारू पिण्यास मनाई, परिसरात थुंकण्यास मनाई, एकावेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक व्यक्ती असण्यास मनाई, ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करून ज्या ग्राहकास सर्दी, ताप व खोकला यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेशास मनाई असे नियम असतील. तथापि सदर मद्यविक्रीची दुकाने कंटेनमेंट झोन वगळता सुरू करण्यास परवानगी आहे. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये कुठल्याही प्रकारे दारूविक्री दुकाने सुरू करण्यास मनाई आहे, असे जिल्हा दंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुमनचंद्रा यांनी कळविले आहे.