बुलडाणा - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना बुलडाण्यात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसला आहे. बुलडाणा मतदारसंघाचे उमेदवार मोहम्मद सज्जाद यांच्या प्रचारार्थ गुरुवारी ते बुलडाण्यात आले होते. ही सभा एआरडी मॉलच्या समोरच्या मैदानात संपन्न झाली. यावेळी पक्ष आणि उमेदवाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे सभेला उपस्थित नागरिकांची संख्या नगण्य होती. यामुळे ही सभा ३ तास उशिरा सुरू झाली.
वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी एमआयएमच्या चिन्हावर भारिप बहुजन महासंघाचे मोहम्मद सज्जाद हे विधानसभा निवडणूक लढवत आहे. यानिमित्त गुरुवारी सकाळी ११ वाजता बुलडाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सज्जाद यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी हे गुरुवारी बुलडाण्यात दाखल झाले. मात्र, ओवैसी हे बुलडाण्यात येणार आहे, याचा प्रचार करण्यात जिल्हा पक्ष कमी पडल्याने सभास्थळी नागरिकांची उपस्थिती अत्यंत कमी होती. पक्षाचा आणि उमेदवाराचा नियोजन शून्य करभार पाहून ते अचंबित झाले. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवार सज्जादला सुनावले असल्याची माहिती आहे. या नियोजनशून्य कारभारामुळे सदर सभा ही तब्बल ३ तास उशिरा सुरू झाली.