बुलडाणा - मेहकर तालुक्यातील मोळा गावातील एका शिवारात शनिवारी अचानक बिबट्या आल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. या बिबट्याने प्रथम एका शेतकऱ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. त्यानंतर इतर शेतकऱ्यांनी तिथे धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. परंतु, या गोंधळात बिथरलेल्या बिबट्याने या नागरिकांवर देखील हल्ला चढवला. यात 5 जण गंभीर जखमी झाले, तर अन्य 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील मोळा गावात बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला... हेही वाचा...नाशिकमध्ये भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पाच जण गंभीर
मेहकर तालुक्यातील जानेफळ गावापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोळा गावातील मोळी शिवारात काही शेतकरी त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी शेताजवळील एका नाल्यातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने शेतातील एका शेतकऱ्यावर हल्ला केला. हे पाहुन शेजारील शेतकरी आणि मजूर तेथे धावले. यावेळी बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे निखिल संजय धोटे, मधुकर वानखेडे, दत्ता वानखेडे (सर्वजण रा. मोळा ता. मेहकर) आणि प्रफुल वानखेडे, गिताबाई कड (सर्वजण रा. मोळी ता. मेहकर) असे पाच जण गंभीर जखमी झाले.
यांव्यतिरिक्त इतर तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमीना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीलायला यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.