बुलडाणा- सोमवारी दुपारी बुलडाण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात उपप्रादेशिक अधिकारी जयश्री दुतोंडे व त्यांच्या चालकाला मारहाण झाली होती. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ आज (24 जुलै) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्याभरातील विविध कामासाठी पोहोचलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दुसरीकडे ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालक असलेले सतीश पवार यांच्या कैकाडी समाजाच्यावतीनेही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात आता राजकीय रंग असल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे खासगी वाहनचालक व सोमेश ड्रायव्हिंग स्कुलचालक यांच्या भावामध्ये मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. दरम्यान, बेकायदेशीर कागदावर स्वाक्षरी करण्याकरिता माझ्यावर आणि माझ्या वाहनचालकावर हल्ला केल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. प्रकरणी सतीश पवार, दिपक पवार, रंगनाथ पवार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दिपक पवार, रंगनाथ पवार यांना अटक केले आहे.