बुलडाणा Lalit Patil Drug Case : ड्रग्स माफिया ललित पाटीलचं नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सातत्त्यानं सरकारवर निशाणा साधत आहेत. 'नाशिक तीर्थक्षेत्र आहे, मात्र आता नाशिकमध्ये गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहचले आहेत. त्याविरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल. राजकीय पुढाऱ्याशिवाय नशेचा बाजार कसा सुरू आहे? ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत', असं राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड :संजय गायकवाड यांनी थेट ललित पाटीलचा संबंध संजय राऊतांशी जोडला. ते म्हणाले की, याच ललित पाटीलला मातोश्रीवर शिवबंधन बांधून त्यांना पक्षाचं कवच कुंडल दिलं, त्याला शहर प्रमुख केलं. मात्र, त्याअगोदरही त्यावर अनेक गुन्हे दाखल होते. उद्धव ठाकरेंना हे माहीत नव्हतं का? , तरीही त्याला मुद्दाम पक्षात घेतलं. त्यामुळं तरुण बरबाद होत आहेत. संजय राऊत यांनाच बेड्या ठोकल्या पाहिजेत. तसंच याप्रकरणी संजय राऊत यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी यावेळी केली.