बुलडाणा- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे फक्त पाच दिवसांचा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऑक्सिजनचा तुटवडा पाहता बुलडाणा जिल्ह्यात पंधरा दिवसांत ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यात केवळ पाच दिवसांचा ऑक्सिजन साठा, टँक उभारण्याच्या कामाला मंजुरी - बुलडाणा कोरोना बातमी
कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा बुलडाणा जिल्ह्यातील साठा केवळ पाच दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्याला आधी ज्याद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा व्हायचा तो, बंद झाल्याने पुन्हा दोन खासगी कंपन्यांशी संपर्क सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना औरंगाबाद, अकोला या ठिकाणावरून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, या परिस्थितीत हा पुरवठा फक्त वीस टक्क्यांवर आला असून खासगी रुग्णालयांत देखील आता ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नाही. परिणामी, खासगी रुगणालयातूनही शासनाला ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजपूत यांनी सांगितले आहे. परिणामी, जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ही गंभीर परिस्थिती पाहता जिल्ह्यातच ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने मंजुरात दिली असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत ऑक्सिजन टँक सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
हेही वाचा -धक्कादायक: बुलडाण्यात 3 कोरोनाबाधित पोलिसांनी कारागृहात 10 दिवस बजावली सेवा