बुलडाणा- जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी गेली पाच महिने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता अर्थव्यवस्थेला खिळ बसत असल्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. या लॉकडाऊन काळात अनेक विकास कामे ठप्प झाली होती. त्याप्रमाणे सिंदखेड राजा येथील राजमाता माँसाहेब जिजाऊ याच्या जन्मस्थळाच्या विकासाचे कामही ठप्प झाले आहे. येथील राजवाड्याची सध्या दूरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निधी देऊन या जन्मस्थळाच्या विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.
लॉकडाऊन काळात जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासाची कामे ठप्प महाराष्ट्राची अस्मिता असलेले राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे सिंदखेडराजा येथील जन्मस्थळ असलेल्या राजवाड्याची दुर्दशा झाली आहे. या राजवाड्यात सध्या पर्यटकांचा वावर कमी आहे. तसेच गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच लॉकडाऊनच्या आधी सुरू असलेले बांधकामही सध्या बंद आहे. त्याचे साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले आहे. आता टप्प्याटप्प्याने देशातील लॉकडाऊन अनलॉक करण्यात येत आहे. राज्यातही अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. जनजीवन पूर्व पदावर येऊ लागले आहे. त्यामुळे पर्यंटनस्थळेही खुली करावीत, तसेच राजवाड्याच्या विकास कामाला तत्काळ सुरुवात करावी, अशी मागणी आता पर्यटकांकडून केली जाऊ लागली आहे.अनेक राजकीय पक्षांनी घोषणा करीत जिजाऊ सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार केला. मात्र त्यासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. स्वतंत्र विकास प्राधिकरण अंतर्गत शहरातील विविध ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी साडेबारा कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर प्रत्यक्षात राजवाड्याचे विकास कामही सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊन काळात हे काम सध्या बंद पडले आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. तसेच पर्यटनस्थळे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळावर जाण्यास अद्यापही बंदी असल्याने निर्जन असलेल्या राजवाड्याची शासनाकडून देखभाल केली जात नसल्याचा आरोप शिव प्रेमी आणि जिजाऊ प्रेमींकडून कडून केला जात आहे.