बुलडाणा : स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा १२ जानेवारीला जन्मोत्सव आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठा सेवा संघ हा मागील ३२ वर्षांपासून जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करत आला आहे. यासाठी राज्यातून नव्हे तर देशभरातून लाखो जिजाऊ भक्त राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा येथे येत असतात. कोरोना गेल्यानंतर यावर्षी जिजाऊ भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. हा जन्मोत्सव लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा जन्मोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी विवेक काळे यांनी व्यक्त केली.
स्वराज्य स्थापनेची प्रेरणा : राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात प्रजेचे हाल सुरू होते. सातत्याने आक्रमणे होत असत. या य़ुद्धाची झळ ही प्रजेला अधिक बसत होती. पिकाने बहरेली शेतजमीन उद्धवस्त होत होती. मात्र शिव जन्मानंतर हे चित्र हळूहळू पटलू लागले. जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. दरम्यान राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा येथे तयारी अंतिम टप्प्यात आली असून, लाखो जिजाऊ भक्तांची गर्दी उसळणार आहे.