बुलडाणा : जिल्ह्यातील शेगाव शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरातील जवळपास 1 कोटीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पोबारा केला. आईच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पालडीवाल परिवार जालना येथे गेले होते. 16 जानेवारी रोजी त्यांच्या घरात काम करणारे दोघेजण नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी आले असता त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला. यानंतर चोरीची घडना उघडकीस आली. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तपासासाठी श्वान पथक, ठसे तंत्रज्ञांची मदत :ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या उपस्थितीत घरातील सामानाची तपासणी केली. त्यामध्ये १४०० ग्रॅम हिरे, दीड किलो सोने, दोन किलो चांदी, 25 लाख नगदी असा एकूण एक कोटीच्या आसपास ऐवज लंपास झाल्याचे समजले. दरम्यान एएसपी अशोक थोरात व डीवायएसपी अमोल कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तंत्रज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 457, 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ करीत आहे. बाहेरगावी जाताना नागरिकांनी पोलीस व शेजारी ना सांगून जावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येते.