बुलडाणा- शेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या जलंब गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावामध्ये महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठिय्या मांडला.
पिण्याच्या पाण्यासाठी जलंब गावातील महिलांचा सरपंचाला घेराव
गावातील संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठिय्या मांडला.
जलंब गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात तब्बल एका महिन्यांनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे गावातील संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतकडे वळवला.
ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना महिलांनी घेराव घालत पाण्याची मागणी केली. काही महिलांनी तर ग्रामपंचायतमध्येच आणलेल्या घागरी फोडल्या. महिलांचे संतप्त रुप पाहून सरपंच आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीमधून काढता पाय घेतला. मात्र, आम्हाला ५ ते ६ दिवसात पाणी मिळाले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा पावित्रा महिलांनी घेतला आहे.